शहीद आशुतोष शर्मा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जयपूर, दि. ५ मे २०२०: उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या कर्नल आशुतोष शर्मा यांच्यावर त्यांच्या जयपूर या मूळगाव मंगळवारी (५ मे) रोजी पूर्ण सैन्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल शर्मा यांच्या वीरपत्नी पल्लवी आणि त्यांच्या भावाने शहीद कर्नल यांचे अंत्यसंस्कार केले. पुरानी चुंगी स्मशानभूमीत शहीद आशुतोष यांचे कुटुंबीय तसेच लष्करी अधिकारी उपस्थित होते. शहीद आशुतोष शर्मा यांच्या पत्नी पल्लवी यांनी धैर्य राखत पूर्णवेळ तिथे थांबून सर्व अंत्यविधिचे कार्य पुर्ण केले .

तत्पूर्वी, जयपूर मिलिटरी स्टेशन येथील ६१ व्या केवलरी मैदानावर शहीद कर्नल शर्मा यांचे पार्थिव शेवटच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळेस मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि दक्षिण पश्चिम कमांडचे, कमांडर आलोक कलेर, इतर अधिकारी व कुटुंबियांनी शहीद आशुतोष यांना पुष्पांजली वाहिली.

उत्तर कश्मीरच्या सीमावरिल कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथील चंजामुल्ला भागात अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी कर्नल शर्मा हे त्यांच्या पथकाचे नेतृत्व करीत होते. ते दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा