मुंबई २२ जून २०२३: महाराष्ट्र राज्य हे गुंतवणूकीसाठी देशात आघाडीचे राज्य असुन परदेशी गुंतवणूकीसाठीही महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील काही वर्षात महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले, मात्र आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २२ हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होईल. मायक्रॉन प्रकल्पांची गुंतवणूक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर चीपचा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती व लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होता. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. यामुळे या नव्या मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणूक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्रातील पुणे परिसरात या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. पुणे हे औद्योगिक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतूकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ त्यांना आवश्यक सोयी-सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत, त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या कंपनीसाठी इथे प्रकल्प लवकर उभा करून उत्पादन सुरू करणे सोपे होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर