पुणे, २६ डिसेंबर २०२०: काल एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी मी कोल्हापूरला परत जाणार, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची खबर घेत आज अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, “एक म्हणतो मी पुन्हा येईल तर दुसरा म्हणतो मी परत जाईल. परत जाण्यासाठी चंद्रकांत पाटलांना पुणेकरांनी बोलावलं कधी होतं.” असा टोला अजित पवार यांनी लावला.
काल एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, पुण्यामध्ये सेटल होणं सगळ्यांनाच आवडतं, येथे विकास व्हावा असं देखील आवडतं. असं बोलत असताना समोर बसलेले श्रोते हसले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मी कोल्हापूरला परत जाणार खास करुन माझ्या विरोधकांना हे सांगा.” याबाबत अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांची चांगलीच खबर घेतली.
अजित पवार म्हणाले की, ” एकजण म्हणतो मी पुन्हा येईल पण ते दुर्दैवानं जमलं नाही. तर आता दुसरा म्हणत आहे की मी पुन्हा जाईल. मुळात त्यांना पुणेकरांनी बोलावलं कधी होतं. तसेच त्यांच्यामुळं आमच्या एक भगिनी मेधा कुलकर्णी नाराज झाल्या तर कार्यकर्ते देखील नाराज झाले. तुम्ही एक वर्ष कुठं झालं नाही तर परत जाण्याचं बोलत आहात. तुम्हाला कोथरूडमधील नागरिकांनी पाच वर्षे साठी निवडून दिलं आहे. येथील नागरिकांना तुमच्याकडून काहीतरी कामं केली जातील याची अपेक्षा आहे. त्यात तुम्ही आता परत जाण्याची भाषा करत आहात, मग तुम्ही इथं आलाच कशाला.”
शेतकरी आंदोलनावरूनही टीका
अजित पवार म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या ऐकल्या पाहिजेत. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं हे नवीन कायदे आणले आहेत तर मग शेतकरी याचा विरोध का करतात? हजारो लाखो शेतकऱ्यांनी आंदोलनांमध्ये का भाग घेतला आहे? याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. इथं बैलगाड्यां मध्ये बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांकडं लक्ष द्यावं.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे