एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

मुंबई: मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात ४ तास उच्चस्तरीय बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग आदी प्रकल्पांचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे, सुुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील या मंत्र्यांसह मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे व अन्य विभागाचे सचिवही उपस्थित होते. राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा आज आढावा घेण्यात आला आहे. विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. हे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून एकही प्रकल्प बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
या बैठकीत राज्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सुमारे चार तास ही बैठक चालली. त्यामुळे या बैठकीत मागच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी दिवसभर चर्चा होती. मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मीडियाशी संवाद साधून ही चर्चा फेटाळून लावली. सध्या राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहे. त्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आला. यावेळी हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा