गुवाहाटी, 22 जून 2022: सुरत वरून निघालेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. काल रात्री एकनाथ शिंदे व बाकी सर्व आमदार सुरत मधून निघाले होते. गुवाहाटी मध्ये पोहोचताच त्यांच्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचं दिसून आलं. तर काही भाजपचे पदाधिकारी देखील निदर्शनास आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
40 आमदार सोबत असल्याचा दावा
गुवाहाटी मध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना आपल्या सोबत 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. त्याबरोबरच आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांची हिंदुत्वाची विचार सरणी पुढं घेऊन जाणार आहोत असं वक्तव्य केलं. एअरपोर्टवरून हॉटेल पर्यंत नेण्यासाठी 3 बस गाड्यांची सोय करण्यात आली होती.
दुपारी मुंबईला रवाना होणार
सुरू असलेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत मुंबईला रवाना होणार आहेत. आपल्या सोबत 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकूणच मुंबईला येऊन ते राज्यपालांची भेट घेणार का, यावर सगळ्यांच्या नजरा टिकून आहेत. जर असं झालं तर महा विकास आघाडी सरकार धोक्यात असल्याचं दिसून येत आहे.
वरवर पाहिलं तर, एकनाथ शिंदे आपल्या सोबत 40 आमदार असल्याचा दावा करत आहे. जर या गटानं भाजपला पाठिंबा दिला तर भाजपचं एकूण संख्या बळ 106+40+13(अपक्ष)= 159 एवढं होईल. म्हणजेच भाजप पूर्ण बहुमतात राहील. यामुळं उद्धव ठाकरे यांना आपल्या खुर्ची बरोबर सरकारही गमवावं लागतं की काय असा प्रश्न उभा राहिला आहे.
शिवसेना सोडणार नाही…
यापूर्वी सुरत वरून निघताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी आणि माझ्या सोबत असलेल्या आमदारांनी केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी फारकत घेतलेली नाही. बाळासाहेबांनी आम्हाला जे हिंदूत्व दिलं आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मांडलेली भूमिका आम्ही पुढं घेऊन जात आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. यामध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही किंवा सोडणारही नाही.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे