अंधारात गुडूप झालेल सार गाव शांत झोपी गेलं होत. ,रातकिड्यांची किरकिर शांततेचा भंग करत होती मधूनच वाऱ्याची झुळूक गारव्याची जाणीव करून देत होती. पक्षांची किलबिल सुरू झाली होती. मध्येच कोंबडा बांग देऊन पहाट झाल्याची जाणीव करून देत होता, झुंजूमुंजू झालं होतं. पूर्व दिशेला लाली पसरू लागली होती.
कोंबड्याने दिलेली बांग ऐकू भैरूला जाग आली. गावात सर्वजण भैरूनाना या नावानेच हाक मारायचे नाना बिछान्यातून उठला व त्याने आपल्या पत्नीला हाक मारली.
गिरिजा अगं ए गिरीजा, उठ आता सकाळ झाली बघ गिरिजन आपली कूस बदलत हुंकार देऊन पुन्हा झोपी गेली. नानांना डबा भरला परसाकडला जाऊन आला. हातावर मिशेरी घेतली तोंडात दात नव्हते तरी सवयीप्रमाणे इकडे तिकडे दोन बोट वढली आणि चूळ भरून घरात आला. चुलीत चार काटक्या घातल्या चिमणी तील रॉकेल त्यावर थोड टाकलं काडी पेटवली चूल पेटली त्यावर आंघोळीसाठी पाणी ठेवत म्हातारीला हाक मारली.
गिरीजा ए गिरीजा उठ आता सकाळ झाली बघ! आता कव्हर झोपशील उठ ! तशी म्हातारी पटकन उठली उठते उठते म्हणाले पण कसा डोळा लागला काय माहित गिरीजा म्हणाली.
म्हातारीने उठून नानाला आंघोळीला पाणी दिला आणि घर अंगण झाडून घेतलं. घरात येऊन चुलीवर चहासाठी आधण ठेवलं. आपल्या सर्व विधी आटपून नानाला हाक मारली.
आवं … तुमचं झालं असेल तर या चहा प्यायला. तसा भैरू आत आला . गिरिजन दोघांसाठी ताटलीत चहा वतला बिनदुधाच्या चहाचे दोन घोट पोटात गेल्यावर थोडं बरं वाटलं. दुपारची जेवणं झाली पडवीला दोघांनाही पसरी टाकली थोडं बरं वाटलं थोडाफार इकडचं -तिकडचं बोलण्यात वेळ गेला असेल नसेल तेवढ्यात गावातून बातमी आली की खालच्या अळीचा नाम्या गेला म्हणून. ऐकून गिरिजा व भैरूला फार वाईट वाटलं.
गिरिजा नानाला म्हणाले, काय वो तुमचा तो जुना मैतर ना ? लय कष्ट उपसले दोघांनी पण, एकुलत एक पोरगा त्याला शिकवला लहानाचा मोठा केला लगीन करून दिलं, शहरात नोकरीला होता . बायकोला घेऊन गेला तो गेलाच. कधीतरी गावाला तोंड दाखवायला यायचा तेही हळूहळू कमी झालं. नामदेवरावाला सून काय चांगली भेटली नाय बघा ! म्हातारपणात सुधीक बिचाऱ्यानं हालत दिस काढलं.
काय करतेस गिरिजा आता कोणीच कोणाचं नाही आता आपलच बघ ना देवाने दोन पोरं दिली, त्यांना लहानाची मोठी केली, चांगले शिकवल, लग्न करून दिले,अजून काय करायचं होतं ग ? एका पोरानं दारूच्या व्यसनात बुडाला आन सुनबाईच्या पदरात दोन पोरी टाकून गेला निघुन. कधी ना येण्याच्या या वाटवर, आणि ती सुनबाय दोन्ही पोरांना घेऊन गेली आपल्या आईबापाकड. ती परत कधी आलीच नाही .की, नातींची तोंड पण पाहायला मिळाली नाहीत. आणि दुसरा बायकोला घेऊन शहरात बस्तान मांडलं बायको पुढे काही चालना त्यामुळे येणंजाणं टाकलं. ना घराकडे बघितल ना आपल्याकडे, माझ्या म्हातार्यान बांधलेलं हे घर आता पडाया झालंय त्याकडं पण बघाना मी तरी काय करणार आता आपले तरी किती दिवस राहिल्यात नाना म्हणाला.
काय करता, नशिबाच्या गोष्टी त्याच्या पुढं कुणाचं काय चालतंय का ? आपली ही अशी तऱ्हा ज्यांना नाहीत त्यांनी काय करायचं,गिरीजा म्हणाली.
भैरूनाना नाम्याच्या मैताला जाऊन आला, आंघोळ केली आणि पडवीला थोड अंग टाकलं. वयाप्रमाणे दगदग सहन होत नव्हती, संध्याकाळ झाली तरी गिरिजान चूल पेटवली दोन भाकरी थापल्या आणि कोपऱ्यातल्या टोपलीतले दोन बटाटे नी कांदे काढले ते चिरून तव्यात उलथे पालथे केले थोड पाणी टाकलं आधण आल्यावर नवऱ्याला हाक मारली, भाकर तुकडा खाऊन घ्या ! मला कसंनुसं होतय .. मग मी थोडसं खाईन खाऊन झाल्यावर गावात जाऊन कणकणी वरची एखादी गोळी आणा म्हंजी जरा बरं वाटलं गिरिजा म्हणाली.
तसा नाना हात धुवून चुलीपुढे येऊन बसला गिरिजाने तत् वाढला आणी म्हणाली घ्या खाऊन तसं नाना म्हणाला तू पण घे खाऊन मला तरी एकट्याला गिळणार आहे का? तेव्हा गिरिजा मनातल्या मनात म्हणाली ते पण खरच आहे मी जर नाही खाल्ले तर यांना जेवण जाणार नाही, म्हणून गिरिजान कोरभर भाकरी कशी तरी गळ्याखाली उतरवली.
जेवण झाल्यावर नानान गावात जाऊन गोळी आणली आन गिरीजाला दिली. गोळी खाऊन झाल्यावर गिरिजान हात हातरून टाकलं दोघे बिछान्यावर पडली. थोड्या वेळ दोघे शांत होती काही वेळानं गिरिजा नानाला म्हणाली आव ऐकलं का?
हा बोल काय म्हणतेस नाना म्हणाले तशी गिरिजा म्हणाली . मी काय म्हणते आपण पंढरपूरला जायचं का? माझी एवढीच इच्छा राहिली बघा. आता आपलं किती दिवस राहिल्यात येऊ इठ्ठलाला भेटून त्याचा नाना म्हणाला चालल की तू म्हणतेस तर उद्याच निघूया की दोघांच्या ठरलं दोघं शांत झोपी गेले.
नाना गिरिजाने सकाळी लवकर उठले सर्व तयारी केली नाना म्हणाले, गिरिजा लागणारे कपडे आणि काय लागते ते सगळं बरोबर घेतलं का? पैसे बरोबर नीट घे,तेवढेच आहेत. आपल्याकडे आयुष्यभर साठवून ठेवलेले हित नको ठेवू चोरी बीरी व्हायची तस गिरीजा म्हणाली नाही सगळं घेतलय पैसे बी कपड्याच्या गाठोड्यात ठेवलेत चला आता. दोघ घरातून बाहेर आली गिरिजना दाराला कुलूप लावले आणि दोघं निघाली.
पुणे स्टेशनला येऊन दोघांनी पंढरपूरला जाणारी रेल्वे पकडली. गाडीला गर्दी खूप होती कशीबशी दोघ गाडीत शिरली जनरल डबाच तो दोघांनी इकडे तिकडे नजर टाकली बसायला कुठे जागा नव्हती मग तिथेच थोडी जागा झाल्यावर खाली बसून अंग टाकलं उशाला कपड्याचं गाठोड घेतलं. पुढे काही वेळानं भैरूने सुद्धा जागा झाल्यावर तिथेच बाजूला मूडा घातला. गाडीने वेग घेतला होता रात्रीचे दोन वाजून गेले होते गाडीत फेरीवाल्यांची ये-जा चालू होती कोणाच्या तरी धक्क्यानं गिरीजाला जाग आली पाहते तर काय घेतलेली कापडाची पिशवी गायब झाली होती व त्या जागेवर दुसरी पिशवी होती. हे पाहून त्याच्या पोटात गोळाच आला घाबरत घाबरतच पिशवीतून सगळं बाहेर काढल तर त्यात फक्त चिंध्या होत्या या दोघांचे कपडे व त्यात ठेवलेले बारा हजार रुपये गायब झाले होते. गिरिजाच्या छातीत कळ आली आणि तिथेच शांत झाली.
पंढरपूर जवळ येत चाललं होतं पहाट झाली होती चहावाल्याच्या आवाजानं नानाला जाग आली तसा त्याने चहावाल्याला हाक मारली ए चाय वाला कसा दिला? दहा रुपये.. चहावाला म्हणाला . नानाने त्याला वीस रुपये काढून दिले व दोन्ही हातात चहा घेऊन गिरीजाला आवाज देऊ लागला “गिरीजा ये गिरिजा उठ आता बघ मी चहा घेतला तुझ्यासाठी ! चहा घे उठ ना ग आता थोड्यावेळाने पंढरपूरला आपल्याला उतरायचे” नाना म्हणाला व गिरीजाला हलवून जागं करू लागला. गिरजा शांत झोपी गेली होती, अंग थंड पडलं होतं गिरीजा काही उठत नव्हती नानाच्या हाका ऐकून आजूबाजूचे सर्व जण जमा झाले. गिरिजाला पाहून आपापसात कुजबुजू लागले.
त्यातलाच एकजण पुढे आला व म्हणाला “बाबा आजी गेल्या सावरा स्वतःला” तासा नाना भानावर आला हमसून हमसून रडू लागला गिरीजा म्हणून नानांनी किंकाळी फोडली व हातातला चहाचा कप गळून पडला. बाजूला नजर गेली तर,कपड्याची पिशवी जागेवर नव्हती “गिरिजा… गिरिजा काय झालं हे जे व्हायचं तेच झालं पैशानेच घात केला. चोरी होईल म्हणून घरात पैसे ठेवले नाहीत गेले तर जाऊ द्यायचा होता ना पैसे” “आता मी काय करू जोडी फुटली अगं आपली… नको होतं तू जायला मला एकट्याला सोडून.. गिरिजा.. गिरिजा आपलं ठरलं होतं ना दोघांनी सांगतच जायचं म्हणून”. ” मग का गेलीस मला एकट्याला सोडून आता मी एकटा काय करू कोणाकडे पाहून जगू ” नानाचा आक्रोश काळीज चिरुन जात होता. लोकांचे डोळे पाण्याने डबडबले होते.
नाना गिरीजाला पुन्हा पुन्हा का मारत होता पैसे गेले तर जाऊ द्यायचं होतं एवढं का मनाला लावून घेतलं आणि मला एकट्याला सोडून गेलीस जोडी फुटली गं आपली नको होतं तू जायला मला एकट्याला सोडून आता मी एकटा काय करू ग… नानांचं रडणं चालूच होतं.
गाडी स्टेशनात आली ,लोक उतरून आपापल्या वाटेने निघून गेले कोणीतरी स्टेशन मास्तरला बातमी दिली. पोलीस व डॉक्टर आले तपासणी झाली रेल्वे संघटनेच्या माणसांनी अंत्यविधीची तयारी केली कार्यकर्त्यांनी चिता रचली गिरिजाला चितेवर ठेवले.
तिकडं नाना भान हरपल्यागत शून्यातून टक लावून सर्व पाहत होता. कोणीतरी नाना हाक मारली “आजोबा उठा शेवटचे पाणी पाजा” नानाच्या हाताला धरुन गिरीजा जवळ नेले नानाने पाणी पाजलं. एकान नानाच्या हातात कोलीत दिल नानानी अग्नी दिला, चिता पेटली आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या व कावळे काव काव करतच घिरट्या घालत होते, आगीचा डोंब उसळला होता त्या आगीत गिरीजा दिसेनाशी झाली तसा नाना भानावर आला व नानान हंबरडा फोडला ” गिरिजा गिरी आता मी काय करू ,कोणासाठी जगु, कोणासाठी माझं आयुष्यच चोरलाय” नानाची ही अवस्था पाहून जमलेल्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नानाने डोळे भरून चितेकडे पाहिले हात पाय लटपटत होते अंगात त्राण नाही उरले नव्हते, शेवटची हाक मारली गिरिजा…. हात जोडून गिरिजाकडे पुन्हा एकदा डोळे भरून पाहिले व नाना मागे फिरला थरथरत्या पावलांनी लटपटत नाना चालू लागला आयुष्याच्या वाटेवरती तो ही एकटाच……
चंद्रकांत कानडे.