नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२३ :दिल्ली महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सदस्य पदाच्या निवडणुका १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के.सक्सेना या निवडणुकांच्या प्रत्सावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.
महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत गोंधळ सुरू आहे. आतापर्यंत अनेकवेळा सभागृहाचे कामकाजही स्थगित करण्यात आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल वी.के.सक्सेना यांच्याकडे निवडणुकांसाठी प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी महापौर निवडणूक ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, एमसीडीशी संबंधित एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून १३ फेब्रुवारीला सुनावणी आहे. त्यामुळे निवडणूक १६ फेब्रुवारीला होतील, असे वी.के.सक्सेना यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक याआधी ६ फेब्रुवारीला होणार होती. तिसऱ्यांदा ही निवडणूक लागली होती. निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली, मात्र आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांचा मतदानाचा हक्क रद्द केल्याने वाद निर्माण झाला. यावरून सरकार आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि गदारोळ झाला, त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज तिसऱ्यांदा तहकूब केले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.