भारतात लवकरच तयार होणार इलेक्ट्रिक हायवे

दिल्ली, ६ जुलै २०२३: हायस्पीड हायवे आणि एक्स्प्रेस वे बनवल्यानंतर आता सरकार इलेक्ट्रिक हायवे बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मार्गही निवडण्यात आला असून लवकरच या महामार्गावर इलेक्ट्रिक बस आणि ट्रक धावताना दिसतील.

बहुतांश रेल्वे गाड्या विजेवर चालवल्यानंतर आता सरकार बसेसही विजेवर चालवण्याची तयारी करत आहे. जर्मनी आणि स्वीडनमध्ये इलेक्ट्रिक बसेससाठी स्वतंत्र मार्ग आहेत, त्यावर बसेसही ट्रेनप्रमाणेच विजेवर चालवल्या जातात. त्याच पद्धतीने भारतातही इलेक्ट्रिक हायवे बांधला जाणार आहे. त्याचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. हा विद्युत महामार्ग दिल्ली ते मुंबई या द्रुतगती मार्गाला जोडून तयार केला जाणार आहे. या महामार्गावर विजेच्या तारा टाकण्यात येणार आहेत. दिल्ली ते मुंबई दरम्यान धावणारा हा जगातील सर्वात मोठा विद्युत महामार्ग बनेल.

इलेक्ट्रिक बसेसचा वेग ताशी १०० किलोमीटर असेल. बिल्ट, ऑपरेट आणि ट्रान्स्फर योजनेंतर्गत इलेक्ट्रिक हायवे प्रकल्प उभारण्याची योजना आहे. टाटा आणि सिमन्स सारख्या कंपन्या या प्रकल्पात रस दाखवत आहेत. इलेक्ट्रिक हायवेवर धावणाऱ्या बस आणि ट्रक सामान्य इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा वेगळ्या असतील. इतर विद्युत उपकरणे ज्याप्रकारे बॅटरीवर चालतात आणि त्यांना चार्ज करणे आवश्यक असते, तसे विद्युत महामार्गासाठी बनवलेल्या बस बॅटरीवर धावणार नाहीत.

इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाणे या बसही इलेक्ट्रिक हायवेवर धावतील. महामार्गावरून जाणाऱ्या विद्युत तारांमधून पॅन्टोग्राफच्या माध्यमातून या बसेसना सातत्याने वीजपुरवठा होत राहणार असून बस धावत राहणार आहे. पॅन्टोग्राफमधून सतत वीज वाहत राहणार असल्याने बसेस पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही, म्हणूनच या बसेसमध्ये बॅटरीचा वापरही केला जाणार नाही.

न्युज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा