पुणे, २९ ऑगस्ट २०२३ : शिवाजीनगर-हिंजवडी पुणे मेट्रोमध्ये आता अत्याधुनिक अशा ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम’ चा वापर केला जाणार आहे. या यंत्रणेचे वैशिष्ट्य असे की, हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर जेव्हा आणि जितक्या वेळा मेट्रो ट्रेन ब्रेक लावेल त्यावेळी होणाऱ्या घर्षणातून वीज निर्माण होण्यास मदत होणार आहे. यामुळे वीज खर्च वाचणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ही स्वच्छ विकास यंत्रणा अंतर्गत विविध प्रकल्प विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.
या अंतर्गत मेट्रोच्या कामकाजामधून होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या संभाव्य ऊत्सर्जनामध्ये नियंत्रण राखणे, ते कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ऊर्जेची पुनर्निर्मिती किंवा फेरवापर करणे. हा फेरवापर शक्य करणारी अत्याधुनिक अशी ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी’ पुणेरी मेट्रोमध्ये वापरण्याची आमची योजना आहे, अशी माहिती पुणे आयटी मेट्रो सिटी रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिलीे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर