नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २०२२ : इलाॅन मस्क यांनी ट्विटरचा कारभार हातात घेतल्यानंतर अनेक घोषणा केल्या. कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यांपासून ते कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यापर्यंत विविध गोष्टी कंपनीत सुरू आहेत. एवढेच नाही, तर ट्विटरच्या कार्यालयालाही टाळं लागलं आहे. इलाॅन मस्क यांनी ट्विटरचा कारभार चालवायला घेतल्यापासून आठवड्यातच या सगळ्या घटना घडल्या आहेत. आठवडाभरात कंपनीची कर्मचारी संख्या निम्म्यावर आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वीच कंपनीतून राजीनामा दिला आहे.
यावरून मस्क यांच्यावर टीकाही केली जात आहे; पण इलाॅन हे स्वतःच्या पद्धतीने कंपनी चालविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यासंदर्भात मस्क यांनी शनिवारी ट्विटरवर कंटेंट मॉड्रेशनसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. नवीन धोरणात युजर्सला मत मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल; पण त्या विचारांच्या रीच (Reach) बाबतचे स्वातंत्र्य नसेल. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर मस्क यांनी ही घोषणा केली.
कर्मचाऱ्यांचा राजीनाम्यावर मस्क म्हणाले, की मी अशा गोष्टींची चिंता करीत नाही. कारण सर्वोत्तम कर्मचारी अजूनही माझ्या कंपनीत काम करीत आहेत. तर ट्विटरवर लिहिताना मस्क म्हणतात “ट्विटरच्या नव्या धोरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; पण तुमची पोस्ट किती लोकांपर्यंत पोचेल याचे स्वातंत्र्य तुम्हाला नाही. नकारात्मक ट्विट शक्य तितके डिबूस्ट केले जातील आणि वेळप्रसंगी त्यावर कारवाई केली जाईल. ट्विटरवर कोणतीही जाहिरात किंवा कमाईचे अन्य साधन उपलब्ध होणार नाही. विशिष्ट गोष्टींचा शोध घेतल्याशिवाय ती गोष्ट ट्विटरवर सापडणार नाही.”
तर ट्विटरने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटर नवीन खात्यांना ९० दिवसांसाठी ब्ल्यू सबस्क्रीप्शन सेवा खरेदी करण्याची परवानगी देणार आहे. युजर्स नवीन अकाउंट व्हेरिफाय करू शकणार नाहीत. बनावट खात्यांची शक्यता कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. अहवालानुसार जुन्या प्लॅनमध्ये प्रतीक्षा कालावधीचा उल्लेख नव्हता; परंतु ९ नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यानंतर तयार केलेली ट्विटर खाती यावेळी ट्विटर ब्ल्यूचे सदस्यत्व घेऊ शकणार नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे