टेंभुर्णीत रतनचंद शहा सहकारी बँकेत ५ कोटी ५७ लाखाचा अपहार

माढा, १ जानेवारी २०२१: सरत्या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात मोठा घोटाळा बँकेतील अधिकार्यांनी केला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला याघटनेने हादरा बसला असून बँकींग क्षेत्रात नवीन वर्षाच्या पुर्वसंधेला रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा, टेंभुर्णीच्या शाखेत मोठा घोटाळा उघडकीला आला आहे.

टेंभुर्णी शहरातील रतनचंद शहा सहकारी बँकेत हातावरील शिल्लक असलेली रक्कमेत ५ कोटी ५७ लाख रुपयाचा अपहार केला असून याप्रकरणी टेंभुर्णी शाखेतील शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरु रा.रा.सांगोला महाविद्यालयाच्या शेजारी, कडलास रोड, सांगोला, ता. सांगोला व कॕशियर अशोक भारकर माळी शुक्रवार पेठ,टेंभुर्णी ता. माढा या दोघा जणांविरुद्ध टेंभुर्णीत अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून दोघेही फरार झालेआहेत. तर शाखेत पैसे काढण्यासाठी खातेदारांनी गर्दी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील संशयित आरोपी हरिदास राजगुरु आणि अशोक माळी हे दोघे टेंभुर्णी शाखेत कार्यरत होते. दोघांनी सगनमत करुन रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील २०१६ ते २०२० पर्यंत प्रत्यक्षात उपलब्ध नसलेली हातावरील शिल्लक रक्कम ११४८७८२२ तसेच बँक आॉफ इंडीया टेंभुर्णी शाखेतील रुपये १,९२,२५,००० त्याच बरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील रुपये २,४९,९०,००० अशी एकूण रक्कम ५,५७,०२,८२२ ( पाच कोटी सत्तावन्न लाख दोन हजार आठशे बावीस रुपये ) इतका अपहार वरील दोघांनी केला असल्याची फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अरविंद हिरालाल नाझरकर रा. मंगळवेढा यांनी दिली आहे. याप्रकरणी वरील दोन संशयितांविरोधात भां.द वि.क.४०६, ४०९,४२०, ४६५, ४६७, ४६८,
४००, ४०१, ४७७ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दिनांक ३१/१२/२०२० रोजी दाखल असून दोघेजण फरर झालेले आहेत.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, अपर पोलीस अधिक्षकअतुल झेंडे निरज राजगुरु उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज उपविभाग, अकलूज चार्ज करमाळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली दिलेल्या सुचनाप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. टेंभुर्णी पोलीसांनी दोन तपास पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींचा शोध सुरू करुन त्यांना लवकरात अटक करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत . पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.

रतनचंद शह सहकारी बँकेची एक शाखा टेंभुर्णी शहरामध्ये आहे. या बँकेने शहर परिसरातील लहानमोठे व्यवसायीक, व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे या शाखेत अनेकांनी मुदत ठेवा, सेव्हिग्ज ठेव, पिग्मी ठेव, आवर्तक ठेव, तसेच दामदुप्पट ठेव आदि प्रकारच्या ठेवीतून बँकेत पैसे भरलेले आहेत. तर सोने तारण, व्यवसायिक कर्ज, बांधकाम कर्ज, वाहन कर्ज, मुदत ठेव तारण कर्ज, आदिच्या माध्यमातून या परिसरातील व्यापारी व नागरिकांनी ठेवी ठेवणे कर्ज घेणे-भरणे यामुळे बँकेचे नाव टेंभुर्णी परिसरात नावारूपाला आल्याने सर्व बँकेचे सुरुळीत चालवण्यासाठी टेंभुर्णी शाखेसाठी मागाल दहा वर्षापासून एकच शाखाधिकारी हरिदास राजगुरु म्हणून तर अशोक माळी हा कॕशियर म्हणून कामकाज बघत होता.

यातून खातेदार, ठेवीदार व कर्जदार यांचेशी सलगी करीत स्नेह वाढवून त्यांचा विश्वास संपादनकेलेला आहे. तर अनेकांचे मुदत ठेवीवर तारण कर्ज काढले तर कोणाचे सेव्हिंग्ज खात्यातून रक्कम काढून घेतली तसेच आनेक सीसी धारकांचे मंजूर कर्जची रक्कम स्वतः वापरली असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

कॕशियर व शाखा अधिकाऱ्याने केलेला नुकताच उघड झाला असून याची माहिती टेंभुर्णी शहर परिसरात पसरली असून परिणामी बँकेचे ठेवीदार, खातेदार आपले पैसे परत मिळावेत म्हणून दोन दिवसापासून एकच गर्दी करु लागले आहेत. यामुळे सदर शाखेत बँकेचे कर्मचारी आणि पैसे काढण्यासाठी आलेले नागरीक यांच्यामध्ये गोंधळ होत आहे. यातून सावरण्यासाठी आज बुधवारी दुपारी पोलिस कर्मचाऱ्यांना मध्यस्ती करावी लागली आहे.

बँकेत किती कोटी रुपयाचा घोटाळा केला यावरुन चर्चेला ऊत आला आहे. तर बँकेतून आपल्या हक्काचे पैसे परत मिळतील का नाहीत यामुळे नागरिक घाबरलेले असून बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांसह नागरीक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. तर बँकेचे अधिकारी आम्ही टेंभुर्णी शाखेतील सर्वांच्या ठेवी परत करणार असून खातेदारांनी घाबरुन जाऊ नये असा विश्वास देत आहेत.

शाखा अधिकाऱ्याने जमवली करोडोची प्रॉपर्टी

यातील संशयित घोटाळेबाज शाखा अधिकाऱ्याने टेंभुर्णीतील कर्जदार असलेले व्यापारी यांच्याशी संबंध वाढवून विश्वासात घेऊन त्याचे नावावरील मुदत ठेवी, सेव्हिंग्ज ठेव, सीसी यातून रक्कम घेऊन परिसरात प्लॉटिंगमध्ये पैसे गुंतवले. तसेच सदर अधिकारी हा चैनबाज असून त्याने आतापर्यंत केलेले कारनामे,रंगरलीया यातून केलेली पैशाची उधळपट्टीची चर्चा दिवसभर टेभुर्णी शहरात चालू आहे.

बँकेत सर्व नवीन कर्मचारी

या अपहार प्रकरणानंतर बँकेचे वरीष्ठ अधिकाऱ्याने या शाखेतील जुना सर्व स्टाफ बदलला असून त्याजागी मुख्य शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांची नेमनूक केलेली आहे. तर नक्की कीती कोटी रुपयाचा अपहार आहे हे पाहण्याचे काम बँकेत चालू आहे. याप्रकरणी गुरुवार दि. ३१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शाखेतील ५ कोटी ५७ लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील तात्कालिन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू व कॕशिअर अशोक भास्कर माळी यांच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुरूवार दि. ३१ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा टेंभुर्णी शाखेत शाखाधिकारी म्हणून हरिदास निवृत्ती राजगुरू रा. सांगोला महाविद्यालयाचा शेजारी, कडलास रोड ता. सांगोला व कॕशिअर अशोक भास्कर माळी रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी ता. माढा यांनी संगनमताने टेंभुर्णी शाखेतील प्रत्यक्ष उपलब्ध नसलेली हातावरील शिल्लक रकमेमध्ये असलेली तफावत रक्कम रूपये १ कोटी १४ लाख ८७ हजार ८२२ रूपये तसेच सन २०१६ ते २०२० या कालावधीत शाखेचा बँक अॉफ इंडिया शाखा टेंभुर्णी या बँकेच्या खातेमधील असलेली तफावत रक्कम रूपये १ कोटी ९२ लाख २५ हजार त्याच बरोबर सोलापूर जि. मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर शाखा टेंभुर्णी या बँकेच्या खातेतील असलेली तफावत असलेली रक्कम २ कोटी ४९ लाख ९० हजार अशी एकूण ५ कोटी ५७ लाख २ हजार ८२२ रूपये इतक्या रकमेचा अपहार तात्कालिन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू व कॕशिअर अशोक भास्कर माळी यांनी संगणमताने केला म्हणून बँकेचे संचालक हिरालाल नाझरकर रा. हजारे गल्ली मंगळवेढा यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात वरील दोघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित फरार असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.

बँकेचे व्यवहार सुरुळीत अफवावर विश्वास ठेऊ नका – राहूल शहा, चेअरमन – रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा

बँकेची स्थिती उत्तम असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. बँकेच्या आकरा शाखा असून २८८ कोटींचा ठेवी आहेत. या उद्भवलेल्या स्थितीला तोंड देण्यास बँक सक्षम असून, अफरातफर करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून वसूल करण्यात येईल. खातेदारांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. बँकेचे व्यवहार सुरळीत चालू आहेत.
राहूल शहा, चेअरमन – रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा