तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या ४७ मिनिटांत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

त्रिवेंद्रम, २३ जानेवारी २०२३ : केरळच्या त्रिवेंद्रम इथून मस्कतला (ओमानची राजधानी) निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानातून १०५ प्रवाशी प्रवास करत होते. उड्डाणानंतर केवळ ४७ मिनिटांत हे विमान पुन्हा खाली उतरवण्यात आले. यामुळे प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमानाने सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्रिवेंद्रम विमानतळावरुन मस्कतसाठी उड्डाण केले होते. पण उड्डाणानंतर पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय पायलटने घेतला आणि ९.१७ वाजता हे विमान पुन्हा त्रिवेंद्रम विमानतळावर उतरवले.

पुढे ते म्हणाले, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे विमान पुन्हा लँड करण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान, या विमानातील प्रवाशांची दुसऱ्या विमानात व्यवस्था करण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा