महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना रोजगार – देवेंद्र फडणवीस

नागपूर, २२ ऑक्टोंबर २०२२: आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून तरूणांना नोकरभरतीत प्राधन्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात १० लाख रोजगार देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आज राज्यातील विविध भागांमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. नागपूरमधील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागातील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात येत आहे. पोलिसांच्या १८ हजार पदांसाठी येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत १० लाख तरूणांची नोकर भरती होणार आहे. तसेच ७५ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेप्रमाणेच येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. आम्ही ठरवलंय की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणारं आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आम्ही १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतरही विभागांनाही निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे.रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश महाजन यांनी आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात घोषणा केली. आरोग्य विभागातील १० हजार १२७ जागांसाठी भरती प्रक्रियेचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा