लातूर, दि.२जून २०२०: सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड योजना प्रत्येक गावात व शिवारात राबवली पाहिजे. या मोहिमेतून प्रत्येक गावात रोजगार निर्मितीचे प्रयत्न करावेत. त्यासाठी महिला बचत गटांमधील सदस्यांना रोपवाटिकेचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोपवाटिकेचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देशपालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लातूर तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख मार्गदर्शन करत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, लातूर पंचायत समितीच्या सभापती सरस्वती पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार, गटविकास अधिकारी श्यामराव गोडभरले उपस्थित होते. तसेच या बैठकीस तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व गावचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व कृषी विभागाने संयुक्तपणे महिला बचत गटातील सदस्यांना रोपवाटिका व्यवसाय करण्याकरिता रोपवाटिकेचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळेल व त्यातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या महिलांनी तयार केलेली रोपे शासन घेईल, असे त्यांनी सांगितले.
सर्व शासकीय यंत्रणेने त्यांना देण्यात आलेल्या सूचना व निर्देशांचे पालन करून सुचवलेली कामे तात्काळ मार्गे लावण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी व केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा, असे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: