जम्मू-काश्मीर, ५ ऑगस्ट २०२३ : जम्मू-काश्मीरमधून मिळालेल्या वृत्तानुसार, कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. याबाबत माहिती देताना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हे तीन जवान जखमी झाले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. मात्र, या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून शोध मोहीम सातत्याने सुरू आहे.
या प्रकरणावर पोलिसांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि सखोल शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सर्च ऑपरेशनचे चकमकीत रूपांतर झाले. आणि सुरक्षा दलाकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली.
या संदर्भात, लष्कराने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुलगामच्या उंच पर्वतावरील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यावर, सुरक्षा दलांनी शुक्रवार ४ ऑगस्ट २०२३ रोजी शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले आणि नंतर शहीद झाले. मात्र सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. यापूर्वी पूंछमध्ये संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये परदेशी दहशतवादीही होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड