श्रीलंका, ५ जानेवारी २०२१: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात १४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी श्रीलंकेला रवाना होण्यापुर्वी इंग्लंड संघाच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आढळला होता. मात्र, आता श्रीलंकेत पोहोचल्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इंग्लंड संघावर नवेच संकट ओढवले आहे. मोईन अलीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने त्याला १० दिवस विलगीकरणात जावे लागणार आहे. त्याच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असेल.
तसेच ख्रिस वोक्स देखील मोईन अलीच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने त्यालाही विलगीकरणात राहावे लागेल. तसेच त्याची पुन्हा एकदा कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे. मात्र, या बातमीने आता श्रीलंका आणि इंग्लंडच्या मालिकेवर चिंतेचे मळभ दाटले आहे.
कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता कुठे क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. अशात जगभरातील काही देशात नव्या कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा क्रिकेट स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्याची वेळ येऊ लागली आहे. इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे त्यांचा नववर्षात होणारा श्रीलंका दौरा संभ्रमात होता. मात्र, सगळ्या शंकांना बाजूला सारत इंग्लंडचा संघ ठरलेल्या वेळापत्रकानुसार श्रीलंकन दौऱ्यावर आला आहे.
दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांच्या सगळ्या खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, श्रीलंकेत पोहोचल्यावर २ दिवसांनी केलेल्या चाचणीत एक खेळाडू पाॅझिटिव्ह आल्याने आता श्रीलंकन बोर्ड काय पाऊले उचलणार, याकडे लक्ष असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे