इंग्लंड ३६ धावांनी पराभूत, टीम इंडियाने मालिका ३-२ ने जिंकली

अहमदाबाद, २१ मार्च २०२१: टी -20 मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताने इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिका ३-२ अशी जिंकली. शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडला २२५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १८८ धावा करू शकला. सामन्यात ४ षटकांत १५ धावा देऊन २ गडी बाद करणार्‍या भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याचवेळी मालिकेत तीन अर्धशतके झळकावणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कर्णधार विराट कोहली (नाबाद ८०) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (६४) यांच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने २ विकेट गमावून २२४ धावांचा विशाल डोंगर उभा केला. इंग्लंड संघाने डेव्हिड मालन (६८) आणि जोश बटलर (५२) यांच्या जोरावर संघर्ष केला, परंतु भुवनेश्वर कुमार (१५/२) च्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी ८ विकेट्सच्या मोबदल्यात १८८ धावा दिल्या.

भारताकडून शार्दुल ठाकूरने ४५ धावा देऊन तीन आणि भुवनेश्वर कुमारने १५ धावांत दोन गडी बाद केले तर अष्टपैलू हार्दिक पांड्याने ३४ धावांत एक विकेट आणि टी नटराजनने ३९ धावा देऊन एक बळी घेतला. आता विजयाची ही लय भारतीय संघ असेच कायम ठेवत २३ मार्च रोजी इंग्लंड सोबत एक दिवसीय मालिका खेळेल

रोहित आणि कोहलीची वेगवान सुरुवात

सलामीच्या सामन्यात जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने भारतीयांना त्रास दिला होता परंतु रोहित (३४ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकार) आणि कोहली (५२ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार) यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी मिळून ६० धावा केल्या. त्या दरम्यान, पहिल्या विकेटसाठी ५४ बॉल मध्ये ९४ धावांची भागीदारी रचली. याशिवाय सूर्यकुमार यादव (१७ चेंडूत ३२ धावा, तीन चौकार, दोन षटकार) आणि पांड्या (१७ चेंडूत नाबाद ३९, चार चौकार, दोन षटकार) यांनीही मोलाचे योगदान दिले.

यजमानांनी अंतिम पाच षटकांत ६७ धावांची भागीदारी करुन विरोधी संघाला विजयाचे मोठे लक्ष्य दिले. बेन स्टोक्स आणि आदिल रशीद वगळता इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांनी प्रत्येक षटकात १० धावांपेक्षा जास्त धावांची सरासरी दिली. ख्रिस जॉर्डन (५७ धावांवर एकही विकेट नाही) सर्वात खराब गोलंदाज ठरला.

वेगवान गोलंदाज टी नटराजनच्या रूपात अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय समाविष्ट करण्यासाठी भारताने सलामीवीर लोकेश राहुलला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. राहुल खेळत नसल्यामुळे कोहलीने रोहितबरोबर डाव सुरू करण्याचा निर्णय घेतला, जो संघासाठी खूप चांगला ठरला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा