पुणे, ३ सप्टेंबर २०२२: सध्या युएईत आशिया चषक २०२२ चा थरार सुरू आहे. आशिया चषकानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक २०२२ खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
यामध्ये मात्र वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान मिळाले नाही. दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर आहे. सध्या खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या जेसन रॉय याला टी२० विश्वचषकासाठी संघात जागा दिली गेली नाहीये.
इंग्लंडने फिल सॉल्टची निवड केली आहे, ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला T२० मध्ये पदार्पण केले होते. २०२१ मध्ये UAE मध्ये T20 विश्वचषक झाल्यापासून, रॉय ११ T20 मध्ये खेळला असून २०६ धावा केल्या आहेत.
दरम्यान, सॉल्टची निवड हे सध्याच्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेतील त्याच्या मजबूत फॉर्मचे बक्षीस आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये ४४.७१ च्या सरासरीने ३१३ धावा केल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ जणांचा संघ जाहीर केला. मात्र संघ जाहीर झाल्यानंतर ५ तासांनंतर संघाला मोठा धक्का बसला. संघातील आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला फलंदाज जॉनी बेअरस्टो जखमी झाल्यामुळे संघातून बाहेर गेला असल्याचे वृत्त आता समोर आलेे आहे. आधी जेसन रॉयची अनुपस्थिती नंतर जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त आणि आता जॉनी बेअरस्टोची अनुपस्थिती यामुळे इंग्लंडला एकापाठोपाठ एक ३ झटके बसल्याचे दिसून येत आहे.
बटलर प्रथमच आयसीसी स्पर्धेत कर्णधार होणार
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर प्रथमच आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, बटलरची मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.
T20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव