छत्रपती संभाजीनगर, ११ मार्च २०२३ : गेल्या काही दिवसांपासून शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या निर्णयानंतर व इतरही काही विषयांवर शहरातील तणावाची परिस्थिती पाहता आणि परस्परविरोधी वक्तव्ये व निवदेन प्रसारित करण्यात येत असल्याकारणाने शहरातील शांतता अबाधित ठेवण्याची मागणी शहरातील उद्योजकांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चितततेला विराम देण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने संबंधित विषय मार्गी लावावा आणि शांतता; तसेच सलोखा अबाधित राखावा, असे या पत्रात म्हटले आहे.
‘छत्रपती संभाजीनगर फर्स्ट’ या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले की, नुकतेच ‘जी-२० परिषदेच्या दोनदिवसीय बैठकीचे आयोजन आमच्या शहराने, विशेषतः प्रशासनाने अतिशय उत्तमपणे पार पाडले. या आयोजनात सर्वच व्यावसायिक आणि औद्योगिक संघटनांचा सक्रिय सहभाग होता. त्यानिमित्ताने शहराचे एक नवे रूप आपण जगाला दाखवू शकलो. जागतिक स्तरावर शहराचे नाव अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता येण्याविषयी आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आणि एकूणच शहरात उत्साही; तसेच सकारात्मक वातावरण तयार झाले आहे; परंतु गेले काही दिवस शहर नामांतर आणि इतरही काही विषयांवर शहर परिसरात अनेक परस्परविरोधी वक्तव्य आणि निवेदने प्रसारीत केली जात असून, ती सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण करू शकेल अशी आशंका वाटते. अशा परिस्थितीत शहरामध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होणे हे कोणालाच परवडणारे नाही. कोणत्याही अशांततेचा पहिला परिणाम दुर्दैवाने व्यापार, उद्योग, पर्यटन आणि पर्यायाने सामान्य माणसांच्या दैनंदिन रोजीरोटीवर होतो.
लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला सार्वजनिकरीत्या आपले मत मांडण्याचा घटनादत्त अधिकार आहे; परंतु अशा अधिकाराचा वापर करीत असताना शांतपणे जीवन जगण्याच्या इतरांच्या अधिकारास बाधा येणार नाही, हे पाहणे सर्व समाजधुरिणांचे प्राथमिक कर्तव्य आहे. तरी एक जबाबदार नागरी संघटना म्हणून आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, या परिस्थितीमळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला विराम देण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने संबंधित विषय मार्गी लावावा आणि शांतता; तसेच सलोखा अबाधित राखावा, असे पत्रात म्हटले आहे.
या निवेदनावर उद्योजक राम भोगे, ऋषी बागला, मानसिंग पवार, प्रशांत देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, प्रसाद कोकीळ यांच्या सह्या आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले