कुपवाड, १४ एप्रिल २०२३: कुपवाड एमआयडीसीतील सूक्ष्म लघुउद्योजकांनी २५ ते १०० अश्वशक्तीच्या वाढीव विजेची मागणी महावितरणकडे केली आहे. मात्र यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे कारण सांगून महवितरण टाळाटाळ करीत आहे. शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीजेचे दर भरमसाठ आहेत. त्यामुळे काही उद्योग परराज्यात गेले आहेत. महावितरणने उद्योगांना वाढीव विजेचा पुरवठा न केल्यास काही उद्योग परराज्यात जाण्याच्या तयारीत आहे.
कुपवाड एमआयडीसीतील सूक्ष्म व लघुउधोजकांना वाढीव विजेचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुरेश खाडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्य शासनाने उधोजकांना २१० अश्वशक्तीपर्यत विजेचा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. यानुसार कुपवाड एमआयडीसीतील अनेक उधोजकांनी महावितरणकडे वाढीव विजेची मागणी केली आहे.
एमआयडीसीतील उधोजकांच्या वीज बिलातून वीज वहन गळतीची वसुली महावितरण कंपनी करीत आहे. वीज वहन गळतीची रक्कम फार मोठी आहे. तसेच १ एप्रिल पासून वीज दरवाढ झाली आहे. शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील विजेचे दर भरमसाठ असूनही उधोजक केवळ उधोग टिकावेत यासाठी प्रयत्न करीत आहे. महावितरण कंपनीने वाढीव विजेचा पुरवठा करण्यास नकार दिल्यास भविष्यात कुपवाड एमआयडीसीतील काही उद्योग परराज्यात जाण्याच्या तयारीत असल्याचा इशारा उधोजकांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर