दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यात वेगवेगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यंदाच्या वर्षीचा पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने साजरा केला जाईल. कारण आपण सर्वजण सध्या कोरोनामुळे घरात अडकून आहोत. त्यामुळे निर्सगाने एकदम मोकळा श्वास घेतला आहे.
या लॉक डाऊनमुळे पर्यावरण सुधारण्यास मदत होऊ लागली आहे. ओझोनच्या थराला पडलेलं ते होल भरून यायला लागल आहे. शहरातही हवा आता शुद्ध वाहू लागली आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने साजरा होताना दिसतो आहे. त्यामुळे पर्यावरणाचा आणि आपल्या आयुष्याचा किती जवळचा संबंध आहे, हे या सध्याच्या परिस्थितीवरून समोर येत आहे.
५ जून १९७४ पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली.खर तर पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा एक उद्देश आहे. आपण दररोज अन्न खातो , श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र हे मानवाकडून होताना दिसतच नाही. उलट माणूस झाडे, तोड, नदी प्रदूषित कर अशा अनेक गोष्टी करत असतो. त्याचाच परिणाम पर्यावरणावर होतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळणे यांसारखे प्रकार घडतात.
१९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.
पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन १०० पेक्षाही जास्त सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत. कारण निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे. २०५० मध्ये जगाची लोकसंख्या तब्बल ९.६ अब्ज असण्याची शक्यता आहे. चंगळवाद भागवण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.
या कोरोनाच्या महामारीतून मानवाने पर्यावरणाचा समतोलाचा धडा घेणे गरजेचे आहे. अन्यथा नैसर्गिक समतोल बिघडायला वेळ लागणार नाही. आणि निसर्गालाही बिघडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे खरा पर्यावरण दिन दरवर्षी साजरा करण्यात यावा, ही सर्व मानावांकडून अपेक्षा..
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर