राज्यातील सहा शहरांत उभारणार ईएसआयसी रुग्णालये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, २१ जानेवारी २०२३ : राज्यात जळगावसह पालघर, सातारा, पेण, पनवेल, चाकण या ठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रुग्णालय उभारण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पर्यावरण, वने आणि कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत वन, कामगार, पर्यावरण, आरोग्य, कौशल्य विकास या विभागांशी संबंधित विविध बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कालबद्ध पद्धतीने त्यावर मार्ग काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

केंद्रीय कामगार विभागामार्फत महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जळगाव, पालघर, सातारा, पेण, पनवेल, चाकण येथे अकराशे खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार असून, त्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत; तसेच काही ठिकाणी उच्चदाब वीजवाहिनी दूर करण्याबाबत चर्चा झाली. या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुलुंड येथे वैद्यकीय महाविद्यालय, तर ठाणे येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येईल, असे भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितले. ठाणे येथील रुग्णालयाचे बळकटीकरण करतानाच तेथे कार्डधारक आणि विनाकार्डधारक रुग्णांना सेवा देण्याबाबत शिंदे यांनी सूचना केली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा