श्रीनगर : कलम ३७० हटवणे भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट करत युरोपियन युनियनने भारताचे समर्थन केले आहे. जम्मू-काश्मिरातील दहशतवादाला पाकिस्तानकडून फंडिंग होत असल्याचे सांगत दहशतवादाविरोधातील लढाईत ते भारतासोबत असल्याची ग्वाहीदेखील जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या युरोपियन युनियनच्या खासदारांनी दिली आहे.
फ्रान्सच्या खासदार हेनरी मलुसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जर कलम ३७० हटवण्याबाबत बोलायचे म्हटल्यास तर हा भारताचा अंतर्गत मुद्दा अाहे. आमची काळजी दहशतवादाबाबत आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत सर्वांनाच भारतासोबत उभे राहायला हवे. त्यांनी सांगितले की, शिष्टमंडळाने सेना तसेच पोलिसांप्रमाणेच युवक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. राज्यात शांतता आणण्याविषयी त्यांचे मत जाणून घेतले. पोलंडचे खासदार रिजॉर्ड जार्नेकी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी चुकीच्या पद्धतीने काश्मीरवर वार्तांकन केले आहे. आम्ही परत गेल्यानंतर जे पाहिले ते त्यांना सांगू. इंग्लंडचे न्यूटन डन्न यांनी सांगितले की, भारताला जगातील सर्वात शांत देश म्हणून आम्हाला बघायचे आहे. आम्ही युरोपियन आहोत, जे अनेक वर्षांच्या लढाईनंतर शांत झाले आहे. भारताला सर्वात शांत देश बनवण्यासाठी दहशतवादाविरोधातील लढाईत आम्हाला त्यांच्यासोबत उभे राहण्याची गरज आहे. या दौऱ्यामुळे आमचे डोळे उघडले आहेत. येथे जे पाहिले ते आम्ही नक्कीच लोकांना सांगू, असेही ते म्हणाले.
शिष्टमंडळाच्या दौऱ्याचा बुधवारी समारोप झाल्यानंतर त्यांनी वार्तालाप केला. कलम ३७० हटवल्यानंतर एखाद्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचा पहिलाच दौरा होता.