हमीपत्र दिल्यानंतरही व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिली नाही पार्किंग; दुकानदारांनी आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

जळगाव, २१ फेब्रुवारी २०२४ : महापालिकेच्या नगररचना विभागाने नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्यावरील तळमजल्याचा पार्किंग ऐवजी व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांना नोटीस बजावून पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच त्यांना पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु तरीही संबधित व्यावसायिकांकडून पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळे आयुक्त डॉ. विदया गायकवाड यांच्या आदेशाने पाच दुकाने सील करण्यात आली होती. यात महापालिकेसमोरील टाईझर, कॉब, सेलिब्रेशन, दिपक शुज, व शितल कलेक्शन अशा पाच दुकानांचा सामावेश होता. यापैकी सेलिब्रेशन व दिपक शुज या दुकानदारांनी तातडीने तळमजल्यात पार्किंग तयार करून दुचाकी पार्क करण्यासाठी रॅम्प तयार केले होते. तर, टाईझर, कॉब व शितल कलेक्शनच्या मालकांनी आयुक्तांना हमीपत्र देवून तातडीने पार्किंग तयार करून तेथे दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात येईल व सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. परंतु यापैकी शितल कलेक्शन या दुकानदाराने अद्यापपर्यंत ना पार्किंग उपलब्ध करून दिली ना रॅम्प तयार केला ना सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. या दुकानदाराने महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखवलेली असून कॉब व टाईझर या दुकानदारांनी देखील नावाला पार्किंग उपलब्ध करून दिली असून त्यांच्या पार्किंमध्ये त्यांची स्वत:ची देखील वाहने लावण्यात येत नाही व सुरक्षा रक्षक देखील त्यांनी नियुक्त केलेले नाहीत. तरी, महापालिकेकडून या व्यापाऱ्याविरूध्द कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे मनपा प्रशासनाच्या कारवाईवर संशय व्यक्त होत आहे. शिवाय या प्रकरणात मनपाच्या दोन अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याची चर्चा आहे. या दुकानदारांसह याच रस्त्यावरील इतर दुकानदारांना देखील कारवाईचा धाक दाखवून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा