कोरोना लसचे दोन्ही डोस घेऊन देखील अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण

5
मुंबई, २३ ऑगस्ट २०२१: राज्य सरकारने कोरोना विषयक नियम शिथिल केले असले तरी अद्याप राज्याची चिंता मिटलेली नाही. त्यात चिंतेची बाब म्हणजे लस घेतलेल्या लोकांनादेखील कोरोना ची लागण होताना दिसत आहे. असाच प्रकार खासदार अमोल कोल्हे यांच्या बाबतीत घडला आहे. कोरोना लस चे दोन्ही डोस घेऊन देखील त्यांना कोरोना ची लागण झाली आहे. ट्विट करत एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम असून यावर माझा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना पॉजिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शासकीय रुग्णालयाचा पर्याय निवडला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या ‘सेव्हेन हिल्स रुग्णालयात’ उपचारासाठी दाखल झालो आहे.’
पुढे ते म्हणाले की, ‘आपण आपल्या व्यवस्थांवर विश्वास दाखविला पाहिजे. दोनवेळा कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा माझी कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची प्रचिती मला आलेली आहे. हा डेल्टा व्हेरीएंट असू शकतो. कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो.’
‘त्यामुळे लस घेतली म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. सर्वांनी कोरोनाचे नियम निर्बंध काटेकोरपणे पाळा. विविध माध्यमातून माझे हितचिंतक काळजी व्यक्त करतायत, शुभेच्छा देतायत त्यांचे मनापासून आभार मानतो.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे