मध्यरात्रीही मल्टिप्लेक्समध्ये ‘दृश्यम २’चे शोज्

मुंबई, २० नोव्हेंबर २०२२ : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘दृश्यम २’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, इशिता दत्त, रजत कपूर, श्रीया सरन, सौरभ शुक्ला यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘दृश्यम २’ हा बॉक्सऑफिसवरील मागचे सर्व विक्रम तोडीत धूमधडाक्यात मल्टिप्लेक्सवर चालत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.३८ कोटी रुपये, तर शनिवारी म्हणजेच अवघ्या दुसऱ्या दिवशी २१.५९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांतच या चित्रपटाने 35 कोटींपर्यंत कमाई केली आहे.

‘दृश्यम २’ला मिळत असलेले हे यश अजय देवगणसाठी दिलासा देणारे आहे. कारण यावर्षी अजय देवगणचे ‘रनवे ३४’ आणि ‘थँक गाॅड’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले नाहीत; परंतु या सिनेमाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपटाचे मध्यरात्रीचे शोज देखील मल्टिप्लेक्समध्ये लावण्याचा निर्णय अनेक मल्टिप्लेक्स चालकांनी घेतलेला आहे. शुक्रवारच्या कमाईत जवळपास ४५ टक्क्यांनी वाढ करीत या सिनेमाने शनिवारी २१.५९ कोटींचा विक्रम केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल, असा अंदाज देखील चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तविला आहे.

विशेष म्हणजे ‘दृश्यम २’ने कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलय्या २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचेही विक्रम मागे टाकले आहेत. ‘भूलभुलय्या २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४.११ आणि दुसऱ्या दिवशी १८.३४ कोटी रुपये कमाई केली होती. थोडक्यात, प्रेक्षकांच्या पसंतीमुळे ‘दृश्यम २’ आता प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समध्ये मध्यरात्रीही पाहायला मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा