एव्हरग्रीन अनिल कपूर यांची बॉलिवूड मध्ये ४० वर्षे पूर्ण

मुंबई २५ जून २०२३: एक उत्कृष्ट अभिनेता म्हणुन, अनिल कपूरने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली ४० वर्षे पूर्ण केली आहेत. याबाबत सोशल मीडियावर बोलताना अनिल म्हणाले की, आज मी अभिनेता आणि एंटरटेनर म्हणून ४० वर्षे पूर्ण केली आहेत. माझी ही ४० वर्षे प्रेक्षकांनी स्वीकारली आणि माझ्यावर प्रेम केेल. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीची एखादी गोष्ट करत असता तेव्हा वेळ खूप वेगाने निघून जातो. माझ्यासाठीही इंडस्ट्रीतील माझी ४ दशके डोळ्यांची पापणी उघडझाप केल्या सारखी निघून गेली, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक नक्कीच नाही. कारण मी माझं आवडीचं काम करतोय आणि मला हेच करत रहायचे आहे.

यावेळी अनिलने त्याच्या ‘वो सात दिन’ या डेब्यू चित्रपटाची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. यासोबतच एक भावनिक नोटही शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी मदत केली. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल त्या सगळ्यांचे आणि विशेषतः माझा भाऊ बोनी कपूर आणि माझे वडील सुरिंदर कपूर यांचे मी आभार मानू इच्छितो. अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचाही मी सदैव ऋणी राहीन, ज्यांनी इंडस्ट्रीत नवोदितांचे स्वागत केले. आज मी जो काही आहे, त्याचे श्रेय मला या दिग्गजांकडून आणि तुमच्या सर्वांकडून मिळालेल्या प्रेमाला आहे.

अनिलच्या या भावनिक पोस्टवर त्याचा मोठा भाऊ बोनी कपूर यांनी तेवढीच भारी कमेंट केली. बोनी यांनी लिहिले, रीना, संजय आणि माझ्यासाठी तू सर्वात चांगला भाऊ, सुनीतासाठी सर्वोत्तम पती आणि सोनम, रिया, हर्ष, आनंदसाठी सर्वोत्तम पिता आहेस. तुझी मेहनत, प्रतिभा आणि प्रामाणिकपणाने तुला बॉलिवूड मध्ये ४० वर्षांपासून सुपर स्टारडम दिले. मला खात्री आहे की ते किमान शंभर वर्षे टिकेल. बोनी यांच्या सोबतच जुही चावला, शिल्पा शेट्टी आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनीही अनिलच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

शेवटी अनिलने लिहिले की, ही ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी ‘द नाईट मॅनेजर पार्ट २’ आणि ‘अ‍ॅनिमल’ या दोन चित्रपटातील खास कॅरेक्टरमध्ये तुमच्यासमोर येत आहे. आशा आहे की तुम्ही मला नेहमीप्रमाणेच प्रेम आणि पाठिंबा द्याल.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा