राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांचं मोफत लसीकरण होणार

मुंबई, २९ एप्रिल २०२१: महाराष्ट्रातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय काल (२८ एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. यासाठी ६ लाख ५०० कोटी रुपये खर्च येणार असून येत्या ६ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मात्र लशींची संख्या कमी असल्यामुळे १ मे पासून सरसकट लसीकरण होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोविन अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लॉकडाऊन १ मे नंतरही वाढण्याची शक्यता असून लॉकडाऊन ७ किंवा १५ दिवसाचा करायचा ? याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेयावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोरोनाची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.”

“उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा