मुंबई, 26 जून 2022: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळं गेल्या 6 दिवसांपासून राज्यात राजकारण तापलेलं आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील लोकांच्या नजरा या घडामोडींकडं लागल्या आहेत. एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असून आता त्यांनी गुवाहाटी मधील आपला मुक्काम देखील वाढवलाय. तर दुसरीकडं शिवसेना आपली संघटना बळकट बनवताना दिसत आहे. काल शिवसेनेकडून दोन मेळावे घेण्यात आले. उद्धव ठाकरे पासून ते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या मेळाव्यांमध्ये आक्रमक भूमिकेत दिसले.
मात्र यावेळी ठाकरे देखील बंडखोर आमदारांवर आक्रमक झालेले दिसते. शिवसेनेच्या दुसऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी चांगलीच फटकेबाजी केली. त्यांनी फुटीर आमदारांवर चांगलीच टोलेबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांनी हाऊसमध्ये आवाज दाखवला ते भास्कर जाधव इथं शिवसैनिकांमध्ये जोश दिसतोय, जे काही होणार ते चांगलंच होणार, घाण निघून जाणार.
ते पुढं म्हणाले, आपण यांना काय कमी केलं, मातोश्रीपर्यंत ह्या लोकांनी येऊ दिलंच नाही, ही आपलीच चुक आहे कोविडच्या काळात काळजी घेणारा माणूस म्हणून मुख्यमंत्र्यांची ओळख. मी दावोसला गेलो तर 80 हजार कोटींचं करार करुन आलो. मुंबई पालिकेवर भाजपचा डोळा, मोह नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी मिळणार? दिलीप मामा लांडे माझा हात हातात घेतला, रडले आणि तिकडं गेले प्रकाश सुर्वे यांचीही कामं केली, पालकमंत्री म्हणून मी फंड दिला. भुमरेंच्या मतदारसंघातली किती कामं केली? मी 32 वर्षाचा, मी राजकारणात ही चूक केली का? असा आदित्य ठाकरेंचा सवाल केला.
प्रत्येकानं राजीनामा पाठवावा, आम्ही निवडणुकीला तयार आहोत
पुढे ते म्हणाले की, तुमच्या ईडीला, सीबीआयला घाबरत नाही. फ्लोअर टेस्ट होणारच आहे. बंड करायला कुठं पळाले? आधी सुरत, नंतर गुवाहटी. माझं नावही आदित्य म्हणजे सूर्य, जिथं जाऊ तिथं प्रकाश पाडू व्हिडीओ बघितला, चेहरे पडलेत त्यांचे, किती अमाप पैसा आहे, एका दिवसाचं जेवणाचं बिल 9 लाख आहे. एका बाजुला लाखो रुपये उडवले जातायत बंडखोरांवर, दुसरीकडं तिथं पूर आहे. जे गेले ते आपले नव्हतेच, काही लोकांनी स्वतःला विकलं. विधानभवनात जाणारा रस्ता हा वरळी, भायखळ्यातून जातो. यांना दोनच पर्याय- एक तर प्रहार पक्षात जा, नाही तर भाजपात, तर प्रत्येकानं राजीनामा पाठवावा, आम्ही निवडणुकीला तयार आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
