पुण्यातील उद्योगपती गौतम पाषणकरांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ

पुणे, २३ ऑक्टोबर २०२०: पुण्यातील पाषाणकर आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर हे बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. ६४ वर्षीय गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी मॉडेल कॉलनी इथून बेपत्ता झाले असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली गेली होती. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाषाणकर हे बुधवारी संध्याकाळी लोणी काळभोर इथल्या त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचं शिवाजीनगर येथील कार्यालय गाठलं. कार्यालयात गेल्यानंतर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला आणि ते गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले.

पाषाणकर यांच्या कार चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने पाषाणकर यांना फोन केला असता त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे चालकाने याची माहिती त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर याला दिली. यानंतर कुटुंबाने शोध सुरू केला असता कुठेही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातुन शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा