मुंबई, १ डिसेंबर २०२०: कोरोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच तडाखा बसला होता. यादरम्यान भारतीय अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांपर्यंत ढासळली होती. तसेच वर्षाचा अंदाज देखील १० टक्केपेक्षा जास्त घसरण्याचा होता. मात्र, दुसऱ्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.५% झाला आहे, ही तज्ञांच्या दृष्टीने आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ञांनी आता भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात सुधारणा केली आहे.
पुढील वर्षाच्या मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आता भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर मधील तिमाहीत जीडीपी विषयी नवीन आकडेवारी समोर आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेकडे सकारात्मकतेने पाहण्यास सुरुवात झाली आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पूर्वी भारताच्या जीडीपी वाढीमध्ये दोन-अंकी घसरण होण्याची शक्यता होती, ती आता कमी होईल. तज्ञांनी म्हटले आहे की, कोरोनाव्हायरसच्या स्थितीनुसार हे चिंतेचे एक मोठे कारण आहे, परंतु लस अस्तित्त्वात येण्याच्या शक्यतेमुळे देशाच्या आर्थिक वाढीचा अंदाज वर्तविला गेला आहे.
नोमुराचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष २०२१ मधील भारताची जीडीपी वाढ ८.२ टक्क्यांनी घसरली. पूर्वी नोमुराच्या अंदाजानुसार भारताच्या जीडीपीमध्ये ११ टक्क्यांनी घसरण होण्याचा अंदाज होता. नोमुराच्या म्हणण्यानुसार तिसऱ्या तिमाही मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये सुधारणा दिसून येईल तर चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी दर हा सामान्य स्थितीला आलेला असेल. नोमुराच्या अर्थशास्त्रज्ञ सोनल वर्मा आणि नोमुराच्या औरोदीप नंदी यांनी जाहीर केलेल्या एका नोटमध्ये असे म्हटले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी चालू आर्थिक वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली. याआधीच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीची वाढ १० टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता होती, तर प्रत्यक्षात ती ७.५ टक्क्यांनी घटली आहे. केअर रेटिंग्जने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ७ ते ७.९ टक्क्यांची घसरण दिसून येईल. संस्थेच्या मागील अंदाजानुसार जीडीपीमध्ये ८.२ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे