नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२० : केंद्रसरकारनं आपत्कालीन कर्ज हमी योजनेचा कालावधी वाढवला असून तो येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत अथवा या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये कर्जाच्या स्वीकृती पर्यंत यापैकी जे कमी असेल, तोपर्यंत वाढवला आहे.
टाळेबंदी शिथील होत असताना अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्र खुली होत आहेत. तसंच आगामी सणासुदीच्या दिवसांत कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या योजनेची घोषणा आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत करण्यात आली असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, वैयक्तिक कर्जदार तसंच मुद्रा कर्जदारांना संपूर्ण हमीनं कर्ज सहज उपलब्ध व्हावं, हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजने अंतर्गत आतापर्यंत ६० लाख ६७ हजार लाभार्थींना एकूण २ लाख तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालं असून १ लाख ४८ हजार कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी