रत्नागिरी ४ डिसेंबर २०२३ : पीक विमा योजनेत आंबा, काजू व संत्रा ही फळपिके आणि रब्बी ज्वारी या पिकांसाठी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात विमा योजना अंतर्गत २०२३-२४ मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता. मात्र, पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले. शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पीक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळ पिकांसाठी तसेच रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी शासनाने ४ व ५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ मंजूर केली आहे.
आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील फळ पिकांसाठी ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. याचा राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरीत भागातील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ असा नियमित आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२३ असा आहे. कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर