नवी दिल्ली, १० डिसेंबर २०२२ :भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना ‘अजेंडा आज तक’ या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांबद्दल प्रश्न विचारला असता जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का ? या संदर्भातही भाष्य केले.
ते म्हणाले, आपली भूमिका तुम्हाला ठाऊक आहे. एखादा देश दहशतवादाला पाठिंबा देतोय आहे हे आपण कधीच स्वीकारता कामा नये. आपण जोपर्यंत याचा विरोध करत नाही तोपर्यंत हे असेच सुरु राहील. त्यामुळेच पाकिस्तानवर जागतिक स्तरावरील दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. दहशतवाला बळी पडलेले (देश) जोपर्यंत समोर येऊन यासंदर्भात उघड भूमिका घेत नाहीत तोपर्यंत हा दबाव निर्माण होणार नाही. यामध्ये भारताने पुढाकार घ्यायला हवा कारण यासाठी आपण रक्त सांडले आहे, असे एस. जयशंकर यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अलीकडेच भारतीय खेळाडू आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे जाहीर केल्याने बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, टूर्नामेंट येतच राहतात आणि तुम्हाला सरकारची भूमिका माहीत आहे. बघूया आता पुढे काय होते ते. सध्या भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण ते दहशतवादाचा मार्ग सोडतील अशी आमची अपेक्षा आहे असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) चे प्रमुख रमिझ राजा म्हणाले होते की, भारतीय संघ त्यांच्या देशात न गेल्यामुळे त्यांचे स्पर्धेचे यजमान हक्क काढून घेतल्यास पाकिस्तान एशिया कप २०२३ मधून बाहेर पडण्याचा विचार करू शकतो.
यापूर्वी, ऑक्टोबरमध्ये, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती आणि म्हटले होते की, आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित केला जाईल. या दोन संघांनी शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२ मध्ये खेळली होती. भारताने आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तान आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार नाही, अशी धमकीही रमीझ राजा यांनी दिली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड.