दिल्ली, ५ जानेवारी २०२३ : जानेवारीच्या सुरवातीलाच देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. मध्यप्रदेश २२ वर्षे आणि पंजाब आणि हरियाणामध्ये प्रत्येकी ११ वर्षांतील थंडीने विक्रम मोडला आहे. संपूर्ण उत्तर भारतात ‘कोल्ड वेव्ह अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांतील थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचलप्रदेशात येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर खूपच थंडी पडली आहे. शहरातील तापमान खूपच घसरले असून, हवा खूपच प्रदूषित झाली आहे. दिल्लीत बुधवारी किमान तापमान ८ तर कमाल तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शीतलहरीमुळे तापमानाचा पारा खाली आला आहे. उत्तर भारतात रेल्वेसह विमानसेवेवर परिणाम झाला असून, रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.
हिमाचल प्रदेशात बर्फाची चादर
हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणचे तापमान शून्य अंशाखाली गेले असून, थंडी आणखी वाढतच आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. बर्फाचे खच पडत असल्याने नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील