पुणे, २८ एप्रिल २०२० : पुणे येथील बॅकस्टेज कलाकार गणेश माळवदकर आणि त्यांच्या कुटुंबियांना सिंहगड कॉलेजच्या होस्टेलवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी त्यांची अत्यंत गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माळवदकर यांनी सांगितले की, याठिकाणची जेवणाची व्यवस्था अत्यंत वाईट आहे. येथे रहात असलेल्या नागरिकांना अनेकदा नासलेले अन्न खाण्यासाठी दिले जाते. याशिवाय जेवणासाठी सर्वांना खाली बोलावले जाते आणि रांगेत उभे राहून जेवण घ्यावे लागत आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या कुटुंबाच्या कोरोनाच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.परंतु तरी देखील इथे असलेल्या कोणाला कोरोनाची लागण झालेली आहे. याची आम्हाला माहिती नाही. तसे आम्हाला प्रशासनाने संगीतलेलेही नाही. तसेच सोमवारी( दि.२७)रोजीही जेवण अत्यंत बेचव आणि खराब आले होते. त्यानंतर आम्हाला या होस्टेल परिसरातील काही तरुणांनी आमच्या जेवणाची सोय केली.
माझं प्रशासनाला एकच सांगणं आहे की, आमच्याकडे लक्ष द्या, आम्हाला इथे ठेवलं आहे ठीक आहे. निदान आमच्या दोन वेळच्या जेवणाची आणि झोपण्याची सोय प्रशासनाने करावी असे आवाहन माळवदकर यांनी “न्यूज अनकट” शी बोलतांना केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी