अहमदनगर : सहा महिन्यात सरकार कोसळणार, दोनशे वीस जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल, एव्हढ्या पण जागा विरोधकांना मिळणार नाही, असे भाष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे सर्व भविष्य खोटे ठरत आहेत. आता त्यांनी चांगला भविष्यवाला शोधावा, असा बोचरा टोला राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी (दि.११) अहमदनगर येथे फडणवीस यांना लगावला.
यावेळी थोरात म्हणाले की, आरोप करायचा पिंड हा अनेक वर्षे विरोधातच राहिलेल्या भाजपचा राहिला आहे. आता पुन्हा ते विरोधात बसल्याने आम्ही केलेल्या चांगल्या कर्जमाफीला विरोध करत आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्या ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे, आमच्या काळात त्या कमी झाल्या होत्या.
मध्यंतरी त्यात पुन्हा वाढ झाली असली तरी आता महाविकास आघाडी कर्जमाफी आदी योजना राबवून विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.