नाशिक मध्ये बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट उघड, जिल्हा अधीक्षक कार्यालयातील लिपिकासह डॉक्टरांचा सहभाग

नाशिक, दिनांक १५ सप्टेंबर २०२२ : नाशिक जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील विविध पोलिसांकडून आंतरजिल्हा बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्रे दाखल केली आल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

राज्यात सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा मान मिळवल्याचा नावलौकिक नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे आहे. त्यामुळे ते सतत चर्चेत असते. या ठिकाणच्या रुग्णांना मिळणाऱ्या ढिसाळ सुविधा, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे उर्मट वर्तन यामुळेही जिल्हा रुग्णालय कायमच चर्चेत असते. परंतु आता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याच्या रॅकेटमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. येथील कर्मचारी कांतीलाल रामभाऊ गांगुर्डे याने गलथानपणा करून, नाशिक ग्रामीण पोलिसांना बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलीस दलातील सुमारे २२ अंमलदारांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज सादर केले होते. यासाठी त्यांनी आपले नातेवाईक गंभीर आजारी असल्याचे, नाशिक आणि धुळे जिल्हा रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट दाखले सादर केले होते. यानंतर अर्जासह सोबतच्या कागदपत्रांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज याने बारकाईने तपासणी न करता बनावट प्रमाणपत्र तयार करण्याकामी मदत केली. यासाठी त्याने नाशिक आणि धुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील अर्जदार पोलिसांचे नातेवाईक गंभीर आजाराचे खोटे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी मदत केली.

यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व लिपिक यांनी संगनमताने अर्जदार पोलिस अंमलदारांना आंतरजिल्हा बदलीसाठी मदत केली. याप्रकरणी अतिरिक्त उपविभागीय पोलिस अधिकारी खंगेंद्र टेंभेकर यांनी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या नंतर या रॅकेटचा पर्दा फाश झालेला आहे.

बोगस प्रमानपत्र तयार करण्याच्या रॅकेटमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज यांचा सहभाग आढळल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. या रॅकेट मध्ये नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, नाशिक आणि धुळे जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, लिफ्टमॅनसह कनिष्ठ लिपिक किशोर पगारे आणि शहरातील दोन हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा