पुणे, ७ जून २०२३ : पुण्यामध्ये सायबर गुन्हेगारांकडून गुन्ह्यांचा धुमाकूळ काही संपायचे नाव घेत नाही. यापूर्वी राजकारण्यांच्या नावाने पैसे उकळून आणि त्यांना धमक्या देऊन झाल्यानंतर आता या सायबर चोरांनी पुन्हा एकदा थेट पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याचे सत्र सुरुच असल्याचे समोर आले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे फोटो वापरून मागील महिन्यात “माही वर्मा” या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव आणि फोटो वापरुन बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी ४ ते ५ वेळा त्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या मित्र परिवारातील अनेकांना रिक्वेस्ट सुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. या संदर्भात राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख याचा फोटो वापरुन हे अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. त्यावरुन अनेकांना मेसेजदेखील पाठवण्यात येत आहे. फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाऊंट माझे नसून कुठल्या ही प्रकारच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका, असे आवाहन स्वतः देशमुख यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर











































