Sale of fake Puma clothes in Talegaon: नामांकित ‘पुमा’ कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करून बनावट कपड्यांची सर्रास विक्री करणाऱ्या तळेगाव दाभाडे शहरातील सहा दुकानदारांवर बुधवारी (२१ मे) दुपारी कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बनावट उत्पादने विकणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही दुकाने प्रतिष्ठित कंपन्यांच्या नावाने बनावट कपडे विकत असल्याची गोपनीय माहिती नवी दिल्ली येथील इलुडिक्सन अडोकेट ॲण्ड सॉलिसीटीस फर्मचे फिल्ड ऑफिसर महेंद्र साहेन सिंग (वय ३६) यांना मिळाली. पुमा कंपनीच्या मालकी हक्काचे (स्वामित्व हक्काचे) उत्पादन कोणत्याही आवश्यक परवान्याशिवाय तयार केले जात आहे किंवा त्याची नक्कल केली जात आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे, महेंद्र सिंग यांनी स्वतः या दुकानांमध्ये जाऊन खात्री केली असता, त्यांना धक्कादायक प्रकार समोर आला. ‘पुमा’ कंपनीचे नाव आणि लोगो वापरून खुलेआम बनावट कपड्यांची विक्री केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तळेगाव दाभाडे पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत, ब्रॉड हब (मालक अमर शाम चव्हाण), छत्रपती मेन्स अटायर (मालक प्रसाद नवनाथ कूल), एचपी क्लॉथ स्टोअर (मालक हितेश उदयसिंग परदेशी), आऊट लुक मेन्स वेअर (मालक सौरव रोहिदार उबाळे), जयश्री एन एक्स (मालक हरिश मोतीराम देवासी) आणि लिमिटेड एडिशन व सेकंड स्किन (मालक शशांक दीपक जैन) या सहा दुकानांवर धाडी टाकल्या. या सर्व दुकानमालकांविरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे बनावट उत्पादनांच्या विक्रीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे