फळ विक्रेत्यांना हटवणाऱ्या पोलिसाची धरली गचंडी.

बारामती, दि. २४ एप्रिल २०२०: लाॅकडाऊनच्या काळात रस्त्यावर फळे विक्री करत गर्दी
जमविणा-या फळ विक्रेत्यांना पोलिसांनी प्रतिबंध केला असता या विक्रेत्यांनी एका पोलिस कर्मचा-याची गचंडी धरत मारहाण केल्याची घटना बारामती शहरात घडली. याप्रकऱणी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात मारहाण, सरकारी कामात अडथळ्यासह साथीचे रोग अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब रामदास मांडे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर), वैभव बाळासो मदने (रा. गवारेफाटा, ता. बारामती) व राजू माणिक बागवान (रा. कचेरी रोड, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांनी फिर्याद दिली. गुरुवार (दि. २३)रोजी दुपारी ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अौदुंबर पाटील, पोलिस कर्मचारी नाळे यांच्यासह पोपट कोकाटे, चालक पवार हे सरकारी गणवेशात सरकारी वाहनाने (एमएच-१२, आरआर-३८४) बारामती शहर हद्दीत दुकाने सुरु राहणार नाहीत यासाठी गस्त घालत होते. शहरातील भिगवण चौक ते टी. सी. काॅलेज रस्त्यावरून ते जात असताना ख्रिश्चन काॅलनीलगत एका झाडाखाली छोट्या टेम्पोतून टरबूज विक्री केली जात होती. तेथे लोकांची गर्दी जमल्याने पोलिस तेथे गेले. त्यामुळे खरेदीला आलेले लोक तेथून पसार झाले. विक्रेत्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी ती सांगितली. यावेळी नाळे यांनी मांडे याला बारामती शहर कोरोनाच्या रेड झोनमध्ये येत असताना येथे गर्दी का जमवली अशी विचारणा केली असता त्याने पोलिसांशी अरेरावी सुरु केली. ‘ मी इथेच विक्री करणार, माझी फळे कुठे विकरणार ‘ असे म्हणत त्याने नाळे यांच्या अंगावर धावून येत गचंडी धरत मारहाण व धक्काबुक्कीस सुरुवात केली. पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्यांची सोडवणूक करत फळ विक्री बंद करत पोलिस ठाण्यात चलण्यास सांगितले असता यावेळी मांडे हा त्याच्याकडील बुलेट (एमएच-११, सीजे-११११) यावर बसून मी पोलिस ठाण्यात येणार नाही, असे म्हणत तेथून पळून जावू लागला. त्यावेळी त्याला थांबविताना पुन्हा पोलिसांशी त्याची झटापट झाली.

या तिघांविरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, मारहाण, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

लाॅकडाऊनमधील दुसरी घटना:

बारामतीत लाॅकडाऊनच्या काळात घडलेली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शहराच्या जळोची भागात होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तिंना समजावून सांगण्यास गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला झाला होता. त्यात पोलिस अधिका-यांसह कर्मचारी जखमी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा