प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

6

दिल्ली, ९ मार्च २०२३: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालंय. त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून या दुःखद बातमीची माहिती दिली. त्यांनी लिहिलं की मृत्यू हे या जगाचं शेवटचं सत्य आहे हे मला माहीत आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

मिस्टर इंडिया चित्रपटातून मिळाली ओळख

सतीश कौशिक हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणामध्ये झाला. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केलं. एक चित्रपट अभिनेता म्हणून सतीश कौशिक यांना १९८७ च्या मिस्टर इंडिया चित्रपटा मधून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी १९९७ मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिका साकारली होती. सतीश कौशिक यांना १९९० मध्ये राम लखन आणि १९९७ मध्ये साजन चले ससुरालसाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

दिल्लीतून शालेय शिक्षण

सतीश कौशिक यांचं शालेय शिक्षण दिल्लीत झालं. किरोडीमल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. १९८३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९८५ मध्ये लग्न केलं. मात्र लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मुलाचं वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं.

काही काळापूर्वी सतीश कौशिक यांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग शेअर केला आणि मंडी चित्रपटासाठी त्यांची भूमिका कशी झाली हे सांगितलं. हा त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. सतीश कौशिक त्यांच्या लूकमुळं खूप काळजीत असायचे, पण श्याम बेनेगलच्या या क्लासिक चित्रपटात त्यांना काम मिळालं. कपिल शर्मा शोमध्ये याबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, “त्यावेळी मला किडनी स्टोनची माहिती मिळाली. मी हॉस्पिटलमधून एक्स-रे करून परतत होतो. मग मला श्याम बेनेगलजींचा फोन आला, त्यांनी माझा फोटो मागितला. माझ्याकडे फोटो नव्हता आणि फोटो पाहिल्यानंतर कास्टिंग होणार नाही हे देखील माहीत होतं. त्या वातावरणात मी थोडी सुधारणा केली. मी त्यांना सांगितले की माझ्याकडे माझी छायाचित्रं नाहीत, पण माझ्याकडं एक्स-रे रिपोर्ट आहे. मी आतून खूप चांगला माणूस आहे. यावर श्यामजी खूप हसले. त्यांनी मला सांगितले की मला फिल्म मंडीत काम मिळालंय.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा