प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन, भारतीय चित्रपटसृष्टीनं गमावला प्रतिभावंत दिग्दर्शक

मुंबई, २४ मार्च २०२३: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज पहाटे साडेतीन वाजता प्रकृती अस्वस्थ्यामुळं निधन झालं. प्रदीप सरकार यांच्या शरीरात पोटॅशियमचं प्रमाण कमी झाल्यानं ते डायलिसिस वर होते. तब्येतीत बदल झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु वयाच्या ६८ व्या वर्षी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी चित्रपट सृष्टीतील फिल्ममेकर हंसल मेहता यांनी ट्विट करत प्रदीप सरकार यांच्या निधनाची माहिती दिली.

प्रदीप सरकार हे नामवंत दिग्दर्शकांपैकी एक होते. परिणीता, हेलिकॉप्टर इला, मर्दानी, लफंगे परिंदे, लागा चुनरी मे दाग हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. तर दिग्दर्शन आणि लेखनाकडं वळण्याअगोदर देखील त्यांनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये स्वतःच्या कामाची छाप पाडली होती. उत्तम उत्तम चित्रपटांप्रमाणेच वेब सिरीज आणि जाहिरातींमध्ये देखील त्यांच्या लेखणीचं विशेष वैशिष्ट्य दिसून येतं.

त्यांना फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट आर्ट डायरेक्शन, झी सिने अवॉर्ड फॉर मोस्ट प्रॉमिसिंग डायरेक्टर आणि इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ अ डायरेक्टर या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. तर ‘परिणीता’ हा त्यांचा सर्वात सुप्रसिद्ध चित्रपट मानला जातो. असं घवघवीत यश मिळवणारा दिग्दर्शक आणि लेखक अचानक गेल्यानं मनोरंजन विश्वास शोककळा पसरलीय. आज संध्याकाळी चार वाजता सांताक्रुज स्मशानभूमीत प्रदीप सरकार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा