मुंबई, २७ ऑक्टोबर २०२२: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन झाले आहे. ते ६२ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी घरी पाठवण्यात आले होते. परंतु आज सकाळी ६. ४५ मिनिटांनी इस्माईल श्रॉफ हे त्यांच्या अंधेरी येथील घरी जमिनीवर कोसळले, त्यानंतर त्यांना पुन्हा अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.
इस्माईल यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. फिल्ममेकर इस्माईल श्रॉफ यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये ‘बुलंदी’, ‘थोडी सी बेवफाई’, ‘सूर्या’ आणि ‘आहिस्ता-आहिस्ता’ सारखे हिट चित्रपट दिले
‘शब्दांपेक्षा कृती जास्त असलेला माणूस’
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी इस्माइल श्रॉफ यांच्यासोबत वेबफाई आणि आहिस्ता आहिस्ता या चित्रपटांसाठी काम केले. त्यांच्या निधनानंतर पद्मिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, ‘मोजक्याच शब्दात बोलणारा माणूस… चित्रपट निर्माता… शब्दांपेक्षा कृती जास्त असलेला माणूस’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
दरम्यान, इस्माईल श्रॉफ यांनी प्रसिद्ध अभिनेते राजकुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर ते सलमान खान अशा अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट दिग्दर्शित केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक