खडकवासला, २३ मार्च २०२३: गुढीपाडव्याला राजगड, सिंहगड, मावळ खोऱ्यातील बांबू विक्रीतून जवळपास एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली. सिंहगड रोड, वडगाव ब्रुदुक, पाषाण, वारजे तसेच शहर उपनगरांतील या बांबूची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे दुर्गम भागातील शेतकरी, मजुरांना रोजगार मिळाला. तोरणा, राजगड, पानशेत इत्यादी डोंगरी पट्ट्यातील बांबूला गुढीपाडव्यासाठी बाजारपेठेत दर वर्षी मोठी मागणी असते. वरसगाव धरण खोऱ्यातील तव येथील बांबूचे व्यापारी लालासाहेब पासलकर म्हणाले ‘गेल्या आठ दिवसांत परिसरात बांबूची जवळपास दीड कोटींची उलाढाल झाली आहे.
तोरणे खोऱ्यातील घेवडे येथील बांबू उत्पादक शेतकरी शिवाजी कडू म्हणाले इमारतींवर उंच गुढी उभारता येत नाही. त्यामुळे नागरिक स्थानिकांच्या गॅलरीवर कमी उंचीच्या बांबूच्या गुढी उभारतात. त्यासाठी पाच ते दहा फूट उंचीच्या बांबूच्या तुकड्यांना मोठी मागणी होती. तीस रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत उंचीनुसार एका बांबूची किंमत होती.
गुढीपाडव्याच्या सणाबरोबर वर्षभर बांबूला शेती, इमारत बांधकाम आदी कामांसाठी बांबूना मागणी आहे. शेवटच्या टोकापर्यंत पक्के रस्तेही अनेक झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांना बारमाही रोजगार मिळाला आहे. मावळातील बांबू सरळ, जाड, टिकाऊ, दर्जेदार असल्याने कलात्मक वस्तू, सुशोभीकरणासाठी अलीकडच्या काळात देशभरात मागणी वाढली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर