थेरगाव, छत्रपती संभाजीनगर, १ फेब्रुवारी २०२४ : यंदा खरीप पेरलं आणि पाऊस गूल झाला. तरीही खरिपानंतर भाजीपाला, फळ पिकास बरे दिवस येतील म्हणून चार एकरावर चार हजार झाडांची पपईची बाग लावली. मात्र, बाजारात पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने आणि पिकासाठी लावलेले खर्चही निघत नसल्याने हताश झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पैठण तालुक्यात असणाऱ्या थेरगाव येथील शेतकऱ्याने पपई पिकावर चक्क ट्रॅक्टरचा रोटाव्हेटर फिरवला.
विष्णू शेषनारायण तापकीर या शेतकऱ्याने चार एकरावर चार हजार पपईच्या झाडाची लागवड लागवड केली होती. उत्पन्न वाढीसाठी त्यांनी महागडी किटकनाशके आणि खते दिली. परंतु पाणीटंचाई व घसरत्या दरांमुळे पपईचा खर्चही पदरात पडत नसल्याने दिसून आल्याने या शेतकऱ्याने जिवापाड जपलेल्या पपईवर रोटाव्हेटर फिरविला. विष्णू ताकपिर म्हणाले की, ‘गतवर्षी अतिवृष्टी तर यंदा कमी पाऊस असल्याने जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. यंदा जेमतेम पाऊस होऊन शेतीची वाट लागली, सर्व खरिपाची पिकं गेली, कुणी आमच्यासाठी काही बोलेना. सर्व काही ऑनलाइन आणि शेतकरी मात्र ऑफलाईन झालय. इतकं कष्ट करून आम्हाला कोणी समजून घेत नाही. कधी नव्हे ती होणारी होरपळ व स्वप्नावर फिरलेलं पाणी पाहून आता शेतीत मजा राहीली नाही’ असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर