शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद, नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घटना

नाशिक, २३ ऑगस्ट २०२३ : नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी संतप्त झाले आहेत. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. चांगल्या दर्जाच्या कांद्याला १ हजार ५०० ते २००० रुपयांचा दर दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये तीन दिवसांपासून ठप्प झालेले कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा व्यापाऱ्यांनी केली होती. पण, शेतकऱ्यांनी आज पुन्हा जोरदार आंदोलन करत नाशिकमध्ये सुरू झालेले कांदा लिलाव बंद पाडले आहेत. केंद्र सरकार कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क मागे घेत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर नाशिकच्या चांदवड बाजार समितीत सकाळीच कांदा लिलाव सुरू झाला होता. कांद्याच्या १५० गाड्या लिलावासाठी बाजार समितीत दाखल झाल्या. त्यामुळे कांदा लिलाव आजपासून सुरळीत सुरू होणार असल्याची चिन्हे होती. मात्र, शेतकऱ्यांनी या लिलावाला विरोध केला. नाफेडचे अधिकारी हजर नसल्याने शेतकरी संतापले. शेतकऱ्यांनी या लिलावाला जोरदार विरोध केला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा ठप्प झाला. शेतकऱ्यांनी पिंपळगाव, चांदवडपाठोपाठ लासलगावमध्येही कांदा लिलाव बंद पाडला. नाफेडने बाजार समितीत येऊन कांदा खरेदी करावा, चांगल्या प्रतिच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळं शेतकरी संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यासोबतच नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र, नाफेड कुठे आहे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. नाफेडने बाजार समितीत येऊन कांद्याला २ हजार ४०० रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लिलाव सुरु होताच कांद्याला १ हजार ८०० ते २००० रुपयांचा भाव पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

नाशिकमध्ये शेतकरी अधिक आक्रमक झाले, त्यांनी कांदा लिलाव बंद पाडून थेट मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. तब्बल दोन तासांपासून अधिक वेळ शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. त्यामुळे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे कांदा लिलावाचा पेच अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा