जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम १०० टक्के मिळेल – मंत्री गिरीश महाजन

जळगाव २३ नोव्हेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी केळी उत्पादक शेतकरी व इतर शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा हवामानामुळे पीक खराब झाले आहेत. त्यांचे विम्याबाबत अजुनही काही अडचणी आहेत. आता बहुतांश लोकांना विमा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही त्यांना आम्ही शंभर टक्के विम्याची रक्कम देऊ अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार २२ नोव्हेंबर रोजीच्या स्वागतप्रसंगी प्रसारमाध्यमांशी ना. महाजन बोलत होते. याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. ना. महाजन पुढे म्हणाले की, कापसाला ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये भाव आहे. यावर्षी कापसाचे उत्पन्न कमी आहे, भाव वाढला पाहिजे ही अपेक्षा सर्वांना आहे. भाव सर्वस्वी अंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड झाली आहे. हे संमेलन सर्वांच्या सहकार्याने न भुतो न भविष्यती यानुसार यशस्वी करू. असा विश्वास ना. महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधानाबाबत राहूल गांधी यांनी केलेल्या बालिश विधानाचा ना. महाजन यांनी चांगलाच समाचार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा डंका देशातच नाही तर जगात असल्याचे सांगीतले. मराठा आरक्षणाचा प्रश्न संकटमोचक गिरीश महाजन यांनी सोडवावा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. त्याला प्रतीउत्तर देतांना ना. महाजन म्हणाले की, तुम्ही तुमच्या तब्यतेची काळजी घ्या. राज्यातील विविध समस्या सोडवण्यासह व विकास कामे करण्यास आमचे सरकार, आमचे नेते हे समर्थ आहेत. आम्हाला तुमच्या तब्येतीचीच जास्त काळजी आहे, असेही ना. महाजन म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा