एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापन प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

जालना २९ जुलै २०२४ : एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापनातून कापसाचे शाश्वत उत्पादन घेणे शक्य आहे, असे मत डॉ.एस.व्ही.सोनुने यांनी व्यक्त केलंय. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने खरपुडी येथे एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ.एस.व्ही.सोनुने बोलत होते. कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.एस.व्ही.सोनुने, कीटकशास्त्रज्ञ प्रा.अजय मिटकरी, मृद शास्त्रज्ञ राहुल चौधरी, कृषि अभियंता पंडित वासरे, नुजीविडू सीडचे विभागीय व्यवस्थापक एस.पी.पवार, प्रभात सीडचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र तायडे, नुजीविडू सीडचे जिल्हा व्यवस्थापक सचिन अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खूप वाढणारा कापूस फायद्याचा नाही. कमी अंतरावर कापूस लागवड करून एकरी १० हजार पेक्षा जास्त झाडांची संख्या ठेवल्यास कापसाचे उत्पन्न वाढणे शक्य आहे. कापूस पिकाला शिफारशीप्रमाणे खतांचा वापर केल्यास व योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास कापसाचे शाश्वत उत्पादन घेता येईल असे प्रतिपादन डॉ.सोनुने यांनी केले. यावेळी एस.पी.पवार यांनी कापसातील वाढ रोधकाचा वापर या विषयी मार्गदर्शन केले. प्रा.अजय मिटकरी यांनी कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तर प्रा.राहुल चौधरी यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच पंडित वासरे यांनी पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

सर्व प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी कापूस पिकात प्रत्यक्ष फळ फांदी आणि वाढ फांदीची ओळख करून देण्यात आली. वाढ फांदी काढण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रशिक्षणासाठी जिल्हयातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा