चढ्या भावाने बियाणे विकून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द, कृषी विभागाच्या कारवाईने शेतकरी समाधानी

अमरावती, ८ जुलै २०२३ : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरा येथे शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन कृषी केंद्र संचालकाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्यापूर येथे अजित १५५ कपाशी बियाणांचा काळाबाजार झाल्याचे मागच्या काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. दर्यापूर न्यू कृषी केंद्राचे संचालक प्रमोद टोपले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृषी केंद्राकडून ८५० रुपयांची बियाणांची बॅग १२०० रुपयांना शेतकऱ्यांना विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

इतर राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेले बोगस बियाणे महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी अनेकदा पकडले आहे. त्याचबरोबर ज्या कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे विकले आहेत. त्यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोगस बियाणे सापडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. परंतु कृषी विभागाकडून खात्री केल्याशिवाय कोणतेही बियाणे खरेदी करु नये असे आवाहन करण्यात आले होते.

राज्यात २५ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर राज्याच्या काही जिल्ह्यात तुरळक प्रमाणावर पाऊस पडला. यामुळे काही प्रमाणावर पेरण्या झाल्या आहेत. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली होती. परंतु आता महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात सध्या पाऊस सुरु झाला असून पेरणीच्या कामांना वेग आला आहे. उशिरा पाऊस दाखल झाल्यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा